धानावरील तपकिरी तुडतुड्याचे वेळीच व्यवस्थापन करावे : कृषी विभागाचे आवाहन

धानावरील तपकिरी तुडतुड्याचे वेळीच व्यवस्थापन करावे : कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर, दि.22 सप्टेंबर : सन 2017 मध्ये  तुडतुड्यामुळे धान पिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. सिंदेवाही येथील  कृषि विज्ञान केंद्राच्या  शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यात सर्वेक्षण केले असता धान पिकावर तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात आढळून आला.मात्र  तापमान वाढीमुळे अधिक आर्द्रता निर्माण झाल्यास तुडतुडा या किडीचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सजग असावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पिल्ले व प्रौढ तुडतुडे झाडाच्या बुंध्यामधुन व खोडामधुन सतत रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून झाड निस्तेज होऊन सुकून वाळते. तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव शेताच्या मध्यभागातुन गोलाकार खळ्याप्रमाणे सुरु होऊन शेत जळल्यासारखे दिसते. यालाच ‘हॉपर बर्न’ असे म्हणतात.

◼️अशा कराव्या उपाय योजना:

मेटारायझीयम ॲनिसोपली हे जैविक किटकनाशक 2.5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बांधीमध्ये वापर करावा. तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच नियंत्रणासाठी बुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 16 मिली किंवा इमिडॉक्लोप्रीड 17.8 एसएल 2.2 मिली किंवा फिप्रोनिल 5 एससी 20 मिली किंवा इथोफेनॅप्रॉक्स 10 टक्के प्रवाही 10 मिली किंवा फ्लोनीकॅमीड 50 टक्के 3 ग्रॅम किंवा थायोमिथाक्झाम 25 डब्ल्युजी 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तपकिरी तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी विशेषत: धानाच्या बुंध्यावरील भागावर जेथे तुडतुडे रस शोषण करतात त्या ठिकाणी किटकनाशक फवारणे आवश्यक आहे.

वरील किटकनाशके व बुरशीनाशके प्रमाण हे साध्या पंप (नॅपसॅक स्प्रे) साठी आहे. हे प्रमाण पेट्रोल, पावर पंपासाठी तिप्पट करावे. फवारणी करतांना सुरक्षा किटचा वापर करावा असे आवाहन विभागीय कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी  संशोधन संचालक डॉ. ए. व्हि. कोल्हे, किटकशास्त्रज्ञ प्रा. पि. पि. देशपांडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. व्हि. जी. नागदेवते  यांनी केले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *