◼️ प्रासंगिक लेख :-हाळोकात तेरावा महिना : अधिकमास !(भाग-२)

हाळोकात तेरावा महिना : अधिकमास !(भाग-२)

लेखक – श्री.कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.

अधिकमास हा श्रावणासारखाच पवित्र समजण्यात येतो. खऱ्या अर्थाने तो पुरुषार्थ गाजविण्यास अनुकूल असतो. उत्तमात उत्तम असा पुरुष घडविण्यास हा महिना तसा सक्षम आहे. भक्तीभावाने आणि चित्त, बुद्धी व मन हे शुद्ध निष्कलंक ठेऊन हा काळ घालवावा. म्हणून याला ‘पुरुषोत्तम मास’ असेसुद्धा म्हटलेले आहे. ईश्वरोपासना, दानधर्म, ध्यानधारणा, ज्ञानोपासना, सत्संग, सेवा, नामस्मरण, ग्रंथपारायणे तथा शास्त्राध्ययन केल्याने मन प्रसन्न ठेवता येते. नेमस्थ व व्रतस्थ आचरणाने निर्विकार-निरामय जीवन जगता येते. विशेषतः सज्जन, संत व विचारवंतांची संगत धरावी. निरंकारी संत भक्तीगीतातून हेच ओरडून सांगतात –
“सतसंग वो गंगा है ।
इस में जो नहाते है ।।
पापी से पापी भी ।
पावन हो जाते है ।।”

_अधिकमास – ठोकताळा :-_
(१) माघी अमावस्या जर १४ ते २४ या तारखादरम्यान असेल तर पुढच्या इंग्रजी महिन्यात अधिकमास असतो. (२) जेव्हा विशिष्ट महिन्यात कृष्ण पंचमीच्या दिवशी सूर्य राश बदलतो, त्याच्या पुढल्या वर्षी त्या विशिष्ट महिन्याच्या आधीचा महिना हा अधिकमास असतो. उदा. १५ जून २०२० रोजी आषाढ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी सकाळी ९.४५ वा. सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केला. म्हणून इ.स.२०२३ साली आषाढाच्या पुर्वीच्या ज्येष्ठ महिन्यात तो असेल.

_नववर्षारंभावर परिणाम :-_
वर्षारंभीच्या चैत्र महिन्यापासून तर आश्विन महिन्यापर्यंतचा कोणताही एक महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते व त्याला एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रविष्ट होण्यास अधिक वेळ खर्ची पडतो. कदाचितच तो कार्तिक अथवा फाल्गुन महिन्यात येतो. त्याच वर्षी एकाच नावाचे दोन चांद्रमास असतात. आधीचा अधिकमास धरला जातो व त्यानंतर येणारा हाच महिना निजमास म्हणून समजण्यात येतो. यंदा आश्विन हा अधिकमास ठरला. तोच पुढे १९ वर्षांनंतर ठरू शकतो. ज्या वर्षी तो चैत्र महिन्यात येतो, त्यावर्षी त्याच्या सुरवातीलाच शक संवत्सराचा अंक एकने पुढे सरकतो. जसे – चालू शके १९४२ असेल, तर ते शके १९४३ असे होईल. गुढी पाडवा मात्र लगेच नंतर प्रारंभ होणाऱ्या निज चैत्र महिन्यात येतो. म्हणजे त्यावर्षी गुडी पाडवा हा नववर्षारंभ ठरणार नाही. तसे तर कोणतेच हिंदुचे सण हे अधिकमासात येत नाहीत. ते सरळ एक महिना पुढे सरकत असतात.
काही वेळा एकाच चांद्रमासात सूर्याच्या दोन संक्रांती येत असतात. म्हणजे नमके होते काय? तर सूर्य दोनदा रास बदललेला असतो. अशावेळी मात्र ‘क्षयमास’ येतो. अर्थात एक महिना कमी होणे याला ‘क्षयमास’ म्हणतात. मार्गशीर्ष, पौष व माघ या महिन्यांमध्ये तो अवश्य येतो, तर अधिकमास येतच नाही. क्षयमासाच्या मागच्या पुढच्या महिन्यात कधीतरी थोड्या अवकाशाने दोन अधिकमासही येऊ शकतात. दानपुण्य करण्यास, सेवा सुश्रूषा धरण्यास शेतकरीबांधव आपल्या कृतीतून दाखवून देतात. जसे – संत कवीवर्य ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे –
“नाना कृषिवलू आपुले । पांघुरवी पेरले ।।
तैसे झाके निजफले । दानपुण्य ।।”
[ पवित्र ज्ञानेश्वरी : अध्याय १३ वा : ओवी २०६ वी ]

_चातुर्मासाची गत:-_

ज्या चांद्रमासात सूर्य एका राशीतून पुढच्या राशीत प्रवेशत नाही, त्या महिन्यात अधिकमास आहे. त्यानंतर निजमास (प्रत्यक्ष तोच महिना) सुरू झाला असे समजतात. अगदी याचप्रमाणे ज्या चांद्रमासात सूर्य एकदम एक रास ओलांडून तिसर्‍या राशीत प्रविष्ट होतो, तेव्हा त्या मासिक कालावधीला ‘क्षयमास’ म्हणतात. बरोबर पौर्णिमेला महिना संपतो. अशा पद्धतीच्या कालमापणात निजमासाच्या एका कृष्ण पक्षानंतर अधिकमासाचे दोन पक्ष पडतात. त्यानंतर त्याचा शुद्ध पक्ष हा दुसरा पंधरवडा असतो. तेव्हा त्या कालमापण पद्धतीतील तद्वतच महिना हा अमावस्येने शेवट होणाऱ्या पंचांग पद्धतीतील अधिकमास हे एकाच वेळी येत असतात. हिंदू पंचांगातील प्रत्येक महिन्यात दोन किंवा अधिक एकादशी असतात. त्यांतील २४ एकादशींपैकी प्रत्येकीस एक स्वतंत्र नाव असते. या कालावधीत येणार्‍या दोन एकादशींना ‘कमला एकादशी’ हेच नाव दिले जाते. चातुर्मासात अधिक चांगले बोलणे, वागणे व वर्तनबदल करणे आदी गोष्टीत तारतम्य ठेवले जाते. एका इंग्रजी गीतातून असे समजावले आहे –
“इफ योर लिप्स्,
मस्ट कीप फ्रॉम स्लिप्स् !
फाइव्ह थिंग्ज् डू विद केअर्.
टु हुम यू स्पिक्,
ऑफ हुम यू स्पिक्.
अँड हाऊ अँड व्हेन अँड व्हेअर् !!”
हा अधिकमास ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात येतो, त्यावर्षी ‘चातुर्मास’ हा पाच महिन्यांचा गणला जातो. इतर वेळी तो केवळ चारच महिन्यांचा असतो. यात नेहमीप्रमाणे विनायकी चतुर्थी व संकष्टी चतुर्थी येत असतात.
!! पुंडलिक वरदा हरी विठ्ठल !! [ क्रमशः ]

पुढील ज्ञानवर्धक माहिती जाणून घेण्यासाठी नियमित वाचत रहा ‘चंद्रपूर सप्तरंग !’ बांधा ‘व्रतस्थ वागण्याचा चंग !!’

लेखक – श्री.कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी, ( डि.शै.दै.रयतेचा वाली, जिल्हाप्रतिनिधी)
मु. श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिर परिसर,
रामनगर वार्ड नं.२०, गडचिरोली,
पो.ता.जि.गडचिरोली.
फक्त व्हा.क्र. ९४२३७१४८८३.
इ-मेल – nikodekrishnakumar@gmail.com

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *