बांबूच्या औद्योगिक व व्यावसायिक महत्त्व याबाबत जनजागृतीची गरज – अन्नपूर्णा धुर्वे (बावनकर)
चंद्रपूर:- “हिरवं सोनं” म्हणून ओळख असलेला बांबू उद्योग व रोजगाराचे महत्त्वपूर्ण माध्यम बनू शकतो, सोबतच पर्यावरणीय दृष्ट्या सुद्धा बांबूचे महत्व अनन्य साधारण आहे. परंतु योग्य जनजागृतीच्या अभावी बांबू या वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक संसाधनाकळे पाहण्याचा दृष्टिकोन मर्यादित असल्यामूळे बांबूच्या विविध उपयोगितेचे सोबतच बांबूच्या व्यावसायिक महत्वाबाबत व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन बांबू आर्ट अॅड नेचर सोसायटी (बांस) च्या सचिव अन्नपूर्णा धुर्वे (बावनकर) यांनी केले.
जागतिक बांबू दिनानिमित्त चिचपल्ली जवळील जाभर्ला येथे बांबू आर्ट अॅड नेचर सोसायटी (बांस) द्वारा आयोजित बांबू रोपटे लागवड कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी बांस चे अध्यक्ष अभय रॉय, बांबू अभ्यासक अनिल दहागांवकर, मंगल वरखडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी अभय रॉय, अनिल दहागांवकर यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. यावेळी बाल्कोवा या बांबू प्रजातीचे रोपटे लावण्यात आले. तसेच ग्रामस्थांना बांबू रोपटे वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सपना येमूर्ला, राहुल स्वामी, मंगेश नैताम यांनी परिश्रम घेतले.◼️