◼️ प्रासंगिक लेख :- कोरोनाचा धुमाकूळ किं (वा) नराचा धुडगूस !

कोरोनाचा धुमाकूळ किं (वा) नराचा धुडगूस !

लेखक : “बापू” – श्रीकृष्णदास निरंकारी

संपूर्ण विश्वभरातून नविन २०२० वर्षाचे जल्लोशात स्वागत झाले. मात्र त्या आनंदालाही नाना प्रकारच्या नैसर्गिक संकटांच्या ग्रहणांनी डागाळणे सुरू केले होते. कधी अवकाळी पाऊस, कधी वादळवारा, कधी गारपीट तर कधी कोरोना विषाणूसारख्या असाध्य मरीमायेची लागण! शेतकरीवर्ग सततच्या अतोनात शेतहानीला कंटाळून आत्महत्या करू लागला आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणूने तर विश्वातील अखिल मानवमात्रास सळो किं पळो करून सोडले आहे. सोबतच चक्रीवादळासह गारपीट होऊन जीवांना अगदी मेटाकुटीला आणत आहे. संपूर्ण विश्वावर हे महामारीचे वादळ घोंगावत आहे. अक्षरशः मृत्यूने आकांडतांडव माजविले आहे. त्यात जगातील लाखों-करोडो लोक कोरोना विषाणूचे नाहक बळी ठरले आहेत. या नैसर्गिक आपत्तीस परतवून लावण्यासाठी सर्वच देश प्रयत्नांची पराकाष्ठा करित आहेत. देश, राज्य व जिल्हासिमा सिल करण्यात आल्या. संपूर्ण देश-विदेश लॉकडाऊन झाले. सर्वत्र संचारबंदी आणि जमावबंदीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आले. आकाश-पाताळी सर्वत्र संचार करत आपलेच अधिराज्य गाजवू पाहणाऱ्या मानवाला आता पळता भुई थोडी झाली. तो स्वतःच स्वतःला घरात कोंबून-डांबून जीव वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागला. त्याने नको नको ते आपले उधम थांबविले अथवा लांबविले? वानर हे नराचे वंशज म्हणतात. कोरोनाचा धुमाकूळ काही केल्या आटोक्यात येत नाही. हे बघून प्रत्येकाला माणसाच्याच वर्तणुकीवर शंका येऊ लागली आहे. माकडचेष्टेप्रमाणे तो काहीतरी उपद्रव वा लुडबूड तर करत नाही ना? ३३ कोटी देवी-देवतांना तो आठवून-आळवून धावा करून थकला. आपल्या गत दुष्कृत्यांची त्याला शरम वाटत आहे. त्यावर त्याला उपरती झाली आहे. म्हणून तो आता घरबसल्या सदाचारावर जोर देत आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव अख्ख्या महाराष्ट्राला गिळंकृत करू पहात आहे. तो स्वयंशिस्तीतून स्वावलंबनाची अशी मुळाक्षरे गिरवू लागला…

१) मोठेपणाचा त्याग :- निसर्गनिर्मित सुक्ष्मातिसूक्ष्म जीव-जंतू अथवा जीवाणू-विषाणूंच्या कार्यक्षमतेपुढे आपली प्रतिकारक्षमता नगण्य आहे. आपण आजपर्यंत विकसित केलेलं तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रगती खूपच खुजी आहे. निसर्गाला आव्हान देण्याएवढे आपण नक्कीच मोठे नाही. आपले खुजेपण आणि निसर्गाचे मोठेपण स्वीकारायला हवे. म्हणून तो मोठेपणा विसरून छोट्याशा मुलाप्रमाणे घरात दडून स्तब्ध बसून राहणे पसंत करतो. घरातील प्रत्येक सदस्यांशी प्रेमाने, अदबशीर आणि मिळूनमिसळून वागू लागतो. कधी नव्हे तो घरगुती कामात जातीने लक्ष घालू लागतो. नेहमी आदेश फर्माविणारा स्वतः जाऊन स्वहस्ते घेऊ लागतो. मानव निर्मित भेदभाव निसर्ग मानत नाही, त्याला सगळे सारखेच! मग मी एक सर्वसामान्य माणूस, भेदभाव कारणारा कोण लागून जातो? आज लाखों-करोडोंच्या संख्येने माणसे किड्या-मुंग्यांप्रमाणे मृत्यूच्या जबड्यात जात आहेत. या निसर्गाच्या महामारी रुपातील मृत्युतांडवाने कोणताही भेदभाव केला नाही, कुणावर कृपा तर कुणावर अवकृपा असा! वर्ण-धर्म, जात-पात, गरीब- श्रीमंत, लहान-मोठा, ज्ञानी-अज्ञानी, सुशिक्षित-अशिक्षित, तरुण-म्हातारा किंवा स्त्री-पुरूष असे काहीच पारखले नाही. सर्वांना एकच भेट – मृत्यू! यातून कोणालाच सवलत म्हणून नाही. जो नामानिराळा राहून नम्रपणे लोककल्याणकारी कार्यात स्वतःला वाहून घेतो तोच जगात ‘नाव’ रुपाने तरत असतो. मानवाने जीवनात सदगुरू अवश्य करावा आणि महाभयंकर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्याचे अगत्यानेच नामस्मरण करावे. असे निक्षून सांगून पुढील आपत्तीविषयी केलेले भाकित आता सत्यात उतरतांना दिसू लागले आहे –

“रे मन धीरज क्यो न धरे ।
संवत दो हजार के उपर ऐसा जोग परे।
पूरब पश्चिम उत्तर दक्षिण चहुँ दिश काल फिरे।
अकाल मृत्यू जगमाही व्यापै सुख की दया फिरे।
काल जाल से वही बचेगा जो गुरू का ध्यान धरे।
सूरदास यह हरि की लिला टारे नाहि टरे।”

२) संयम व विश्राम :- आयुष्यात गती महत्वाची… पण कुठेतरी स्वतःहून थांबणं त्याहून अधिक महत्वाचं! दुसऱ्याने थांबवलं की जास्त त्रास संभवतो. म्हणून स्वतः कधीतरी थांबूया. जे मागे राहिलेत त्यांना सोबत घेऊया. थोडी विश्रांती घेतली तर पुढील मार्गक्रमणात उत्साह अधिक काळपर्यंत तग धरून राहू शकतो. अन्यथा अशी सक्तीची विश्रांती खूप महागात पाडून जाते. ती सक्तीची विश्रांती मृत्यूच ठरू शकते. संयमाने व सहनशीलतेने उचललेली पाऊले सदैव सन्मार्गावरून चालवत प्रगतीच्या शिखरावर नेऊन पोहचवितात. घरातल्या कुणाला जर कोरोना किंवा तत्सम विषाणूची लागण झाली तर सरळ त्याला उचलून रूग्णालयात घेऊन जातात. तो जगला तरच घर-घर करत परत येतो. नाहीतर फक्त फोन करून सांगतात, ”क्षमस्व..! वाचवू शकलो नाही. तो देवाला प्रिय झाला!” ना डेड-बॉडी बघायला मिळते नाही अंत्यदर्शन! आणि कुठे भडाग्नी दिला? किं मातीत पुरला? हेही आप्त-स्वकीयांना कळेल तर शपथ! सोबत आहोत तोपर्यंत प्रियजनांना वेळ देणं गरजेचं आहे. मनातलं गुपित सांगणं महत्वाचं आहे, सोबत राहणं गरजेचं आहे. प्रेम करा, माफी मागा, हट्ट पुरवा..! कारण कदाचित मनुष्यजन्म पुनर्पि मिळणार नाही. सदोदित ध्यानी मनी व स्मरणी राहू द्या – ‘हेही दिवस जातील !’ हाच एक आसेचा किरण आहे. म्हणून धूर्तपणा सोडून सत्कर्म आचरावे. असे शिक्षणमहर्षी राष्ट्रपितामह विश्वरत्न जोतिरावजी फुले माणसाला खडसावितात –

“स्वतःच्या न्युन्यता व्येंगे सुधारती । सत्याने वागती।सर्वासंगे ।।
माझ्याशी लोकांनी जसे बा वर्तावे । तसे मी वर्तावे । जणासंगे ।।
त्यात दुजा भाव नसावा अंतरी । मग मौजा मारी । जगामांजी ।।
आत्मपरीक्षेत असावे सावध । जोती करी बोध । धुर्तलोका ।।”
_( अखंडादि काव्य : विभाग १ : आत्मपरीक्षण : अखंड क्र. १२ वा. )_
जवळजवळ ७-८ महिने पूर्ण होऊन आता हळुहळू एक वर्ष पूर्ण होऊ लागला आहे. मात्र रईस माणूस सांभाळून चालण्याचा नावच घेत नाही. बिचारी सामान्य माणसे रोजीरोटीविना भुकमरीने मरत आहेत.
३) अतिव हाव :- कितीही श्रीमंती असली तरी तुम्ही सर्वच गोष्टी विकत घेऊ शकत नाही. तुम्हाला आयुरारोग्य, सुख, समाधान, सुसंगती, सुसंधी आणि सदाचार आदी गोष्टी विकत मिळतील का बरं? नाही, तर त्या परिश्रमाने कमवाव्या लागतात. अशा या जोखमीच्या वेळी संशयीत रूग्णांना शासकीय रूग्णालयातच दाखल करावे लागते. त्याला ‘स्पेशल ट्रीटमेंट’ म्हणून पैशाच्या पेलावर दुसऱ्या हाय-फाय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू शकत नाही. जरी पैसे खुप असतील तुमच्याकडे परंतु तुम्ही कुणाला लाचलुचपत देऊन झटपट उपचाराची तजविज लावू शकणार नाहीच ! आजचा दिवस उद्याच्या चिंतेत वाया घालवणे हे चुकीचेच आहे. भविष्याचे नियोजन असणे गरजेचे, पण त्याचा दबाव वर्तमानावर नको किंवा त्याचे टेंशन आपल्या मन-मस्तिष्कातसुध्दा नको. वर्तमान जीवन आनंदात घालवणे खूप महत्वाचे.. “क्या भरोसा है जिन्दगानी का ? आदमी बुलबुला है पानी का…!” हे लक्षात घ्यावे.

परिस्थिती अनुरूप सगळ्यांनाच एक अतिविशिष्ट महत्व असतं. जगात सगळे लोक तितकेच महत्वाचे असतात. अगदी वृक्ष-वेली, प्राणी-पक्षी व सूक्ष्म जीव-जंतूसुध्दा! फक्त परिस्थिती अनुरूप त्यांचे महत्व बदलते. आज ज्यांच्या घरी लहान लेकरं आहेत त्यांच्या साठी दूधवाला सगळ्यात महत्वाचा आहे. पिकावरील किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चिमण्या महत्वाच्या ठरतात, पण त्यांचेही अस्तित्व धोक्यात आणले ते आपणच माणसांनी! ज्यांचे नातेवाईक आजारी आहेत त्यांच्यासाठी डॉक्टर महत्वाचा ठरतो. अशा कोरोना संसर्गाच्या थैमानात तर डॉक्टर, नर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आदी आपणा सर्वांसाठी देवदूतच नाही का? अशा सगळ्यांचा आदर करायला स्वतः शिकलं पाहिजे. इतर सजीवांचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे. हे नको का कळायला? कारण निसर्गाची शिकवणी फी खूपच जास्त व प्रशिक्षण जाचक-वेदनादायक आहे. तो शिकवतो तसाच तो अविस्मरणीय अद्दलही घडवीत असतो. आपल्या जिभेचे चोंचले पुरविण्यास वा स्वार्थ साधण्यासाठी मुक्या प्राण्यांची हत्या करतात त्यांना लाखो प्रयत्न करूनही जीवनात सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही, असे विश्वशांतीचे जनक तथागत भगवान गौतमजी बुद्ध ताकीद देतात –

“सुखकामानि भूतानि यो दण्डेन विहिंसती ।
अत्तनो सुखमेसानो पेच्च सो न लभतें सुखं ।।”
_( पवित्र धम्मपद : अट्ठकथा – १३१ : दण्ड वग्गो – १० : ३ )_

४) स्वावलंबन :- आपल्या परिस्थिती साठी नेहमी आपणच जबाबदार असतो. सरकार आणि प्रशासन फक्त मार्गदर्शन करू शकतात किंवा कायदे नियम बनवू शकतात पण त्यांचं पालन करणे हे प्रत्येक इसमाच्या हातात आहे. जबाबदार नागरिक असणे आणि ते कृतीतून दाखवणे फार महत्वाचे आहे. नाहीतर त्याचे परिणाम स्वतःला आणि समाजाला भोगावे लागतात. डोळे उघडे ठेवून परिस्थितीचे अवलोकन करणे महत्त्वाचे आणि त्यातून शहाणे होणे त्याहून अधिक महत्त्वाचे असते. दुसऱ्याने केलेल्या चुका परत आपण केल्या तर त्याचे दुष्परिणाम आणखी जास्त भयानक असतात. आपणच आपली दैनंदिन जीवनातील नित्याची वैयक्तिक कामे उरकून घेण्यात कसली आली बरं लाज? माणूस बेजबाबदारपणे वागतो, वावरतो. त्यामुळेच त्याला संसर्गजन्य साथीच्या रोगांना बळी पडावे लागते. नेहमी दक्षता बाळगून निर्व्यसनी जीवन जगावे, असा आरोग्याचा मंत्र वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिकवतात –

“चहूबाजूंनी केली घाण । त्यात जंतू झाले निर्माण ।।
त्यातुनि रोगांच्या साथी भिन्न भिन्न। वाढ होती ।।८।।
हॉटेली खाणे मसणा जाणे । ऐसी बोलली शहाणे ।।
त्यावरी नाना तिखट व्यसने । आग्या वेताळांसारखी ।।११।।
कशास काही नियम नुरला । कोण रोगी कोठे थुंकला? ।।
कोठे जेवला संसर्गी आला? गोंधळ झाला सर्वत्र ।।१२।।”
_( पवित्र ग्रामगीता : अध्याय १४ : ग्राम आरोग्य )_

५) मूलभूत गरजा :- आज संपूर्ण जगच लॉकडाऊनच्या बंदिखान्यात बंदिस्त झालं आहे. असे का? माणसे एकमेकांच्या संपर्कात येऊन महामारीचा संसर्ग होऊ नये म्हणून… गेले काही महिने व दिवस घरी बसल्यावर आपल्याला एक नक्की समजले असेल की खऱ्या गरजा या खूपच कमी आहेत.अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्या शिवाय आपण जगू शकतो. आपण आपल्या अनावश्यक गरजा ओळखायला हव्यात आणि त्याची सवय हळूहळू मोडायला हवी. माणसाने वाईट व्यसने, मॉडर्न फॅशन्स, चैनीच्या वस्तू विशेषतः टाळलेल्याच बऱ्या! अन्न-पाणी, वस्त्र-प्रावरणे, घर-निवारा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण याच त्या अगदी मूलभूत गरजा होत. आधीच पुरेसे पोशाख असतांना आलमारीत चवळच्या चवळ होईल एवढे खरेदी करणे योग्य नसते. काही गोष्टी मानव समाजात उपजतच आहेत आणि त्यामुळेच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. गेल्या काही दिवसांत आपण आपल्यातील या चांगल्या गोष्टींची उजळणी केली आणि इथून पुढेही करत राहू. युगदृष्टा सदगुरू निरंकारी बाबाजींनी ग्रंथरुपाने नकलून ठेवले –

“सुख भी है वरदान तेरा दुःख तेरी सौगात है ।
दोनो ही जब तेरे है तो डरने की क्या बात है ।
तू जब जब भी जो जो चाहें सो सो होता जाता हैं ।
तेरे आगे कभी किसी का जोर कहा चल पाता हैं ।
कहें ‘हरदेव’ विधान में तेरे आनंद ही आनंद हैं ।
हमें पसन्द हो वही विधाता जो भी तुझे पसन्द हैं ।”
_( सम्पूर्ण हरदेव वाणी : पद क्र. ९ )_

आता तर सारी नावाच्या आजारानेही डोके वर काढले आहे. गाईगुरे व इतर प्राण्यांवर स्किन लम्पी व काँगो विकार थैमान घालू लागला आहे. प्राण्यांच्या शरीरभर फोड उठून जखमा तयार होतात. संपर्कात येणार्‍या माणसालाही त्याची लागण होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. आपल्याजवळ आता एकच पर्याय शिल्लक आहे. या जीवघेण्या आजारांची विकृती वा निर्मिती ही नैसर्गिक अथवा कृत्रिम म्हणजेच नर किं वानरनिर्मित कशीही असू द्या. स्वच्छता राखत, मास्क, सॅनिटाइझरचा वापर करत शारिरीक अंतर पाळत आपले पोटापाण्याचे कामधंदे केले पाहिजे. सुख-दुःख परमपिता परमात्म्याचीच देणगी मानून मनाला समजावणे आहे. शासनही परमेशाचेच एक रुप समजून आदेशाचे काटेकोरपणे पालन करुया. बाहेर कामाशिवाय भ्रमिष्टासारखे न भटकता आपल्या घरातच राहून या संकटांना माघारी परतण्यास भाग पाडुया.
!! प्रेमाने बोलुया, ‘धन निरंकार जी’ !!

◼️- क्षमाप्रार्थी -◼️

“बापू” – श्रीकृष्णदास निरंकारी,
[ मराठी साहित्यिक व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक ]
मु. श्रीगुरूदेव प्रार्थना मंदिराजवळ,
रामनगर वार्ड क्र.२०, गडचिरोली.
पो. ता. जि. गडचिरोली.
फक्त व्हा. नं. ९४२३७१४८८३.
इ-मेल : Krishnadas.nirankari@gmail.com

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *