◼️ काव्यरंग :- फुगेवाला ✍️ सदस्य,मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात दि ०७/१०/२०२० रोजी घेण्यात आलेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न‘ स्पर्धेतील ‘फुगेवाला‘ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे.

फुगेवाला

दारावरुन जाणारा फुगेवाला
जेंव्हा जात होता समोरुन,
खेड्यातील बापाने त्याला
बोलावले हाताला धरुन!

बाप म्हणाला,”आज आहे,
माह्या पोराचा बड्डे भाऊ,
अगोदर सजव घरात फुगे
तवर कुठंही नगंस जाऊ!”

फुगेवाला म्हणे,”चला, चला
लवकर खोली सजवून देतो,
त्यांतून आलेल्या पैशांतून
घरधणीनीसाठी राशन घेतो!”

ऐकून बापाच्या डोळ्यात आले
गंगा, यमुना नद्यांचे पाणी,
“बड्डे झाल्यावर जेवूनच जा,”
म्हणे,”असो काहीही आणीबाणी!”

खरंच फुगेवाल्याला जेवताना पाहून
बाप मनातून सुखावून गेला,
असा वाढदिवस त्या मुलाच्याही
जीवनात नंतर नाही आला!

श्री.मंगेश पैंजने सर,
ता.मानवत,जिल्हा-परभणी,
© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.
🎈✍️🎈✍️🎈✍️🎈✍️🎈✍️🎈

फुगेवाला…
( षडाक्षरी रचना )

आला फुगेवाला
फुगे घेऊ चला
मौज करू मजा
फुगे घ्याना मला…||१||

लंब गोलाकार

फुगे ते सुंदर 
छान हे आकार
हवा नेई वर…||२||

दिसती अनोखे
रंगांचे या चट्टे
मोहक वाटती
तयावरी पट्टे…||३||

नित्य दिनरात
मैत्रीच्या संगती
सारेच नवीन
खेळ हे रंगती…||४||

गावोगावी छान
यात्रा उत्साहाला
फुग्यांमुळे आली
शोभा उत्सवाला…||५||

बांधूनिया गाठ
फुगा फुगवूनी
गुंफूनिया धागा
मागेच फिरूनी…||६||

*✒ श्रीगणेश शेंडे , भुईंज , सातारा.
© सदस्य , मराठीचे शिलेदार समूह.
🎈✍️🎈✍️🎈✍️🎈✍️🎈✍️🎈
फुगेवाला

काम म्हणजे परमेश्वर
कोणतेही काम आनंदाने करतो
पोटाची खळगी भरण्यास
फुगे विकणारा फुगेवाला होतो

निर्जीव फुग्यात माझ्यातील
श्वास भरूनी जीव ओततो
रंगीबेरंगी फुग्यांची नक्षी करून
बाळगोपाळांना आकर्षित करतो

कधि सायकल तर कधि चालत
गावोगाव पायपीट करतो
मिळालेल्या मोबदल्यात माझ्या
चिमुकल्यांची भुक भागवतो

बागेच्या दिशेने,रेल्वे स्टेशन
बस स्टॅन्ड, बाजारात फिरतो
कधि केसावर तर कधि पैशाने
गिऱ्हाईक मिळेल तसे फुगे विकतो

संसाराचा गाढा हाकतांना
दमतो, थकतो पण हारत नाही
रंगीत फुग्यांच्या सहवासात
आयुष्याला रंग नवा येई

उडणारा फुगा मला
सतत खुणावत असतो
अंतर्मनात ठेव जिद्द गाठशील
यशोशिखर सांगत असतो

मीही आहे खुश फार
समाधान वाटे जीवाला
बघताच प्रेमळ हाक ऐकू येई
आला फुगेवाला आला फुगेवाला

श्रीम. संगिता बनसोड
माणगांव, रायगड
©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🎈✍️🎈✍️🎈✍️🎈✍️🎈✍️🎈

मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

2 Replies to “◼️ काव्यरंग :- फुगेवाला ✍️ सदस्य,मराठीचे शिलेदार समूह”

 1. अप्रतिम रचना आपल्या तिघांच्याही.
  अभिनंदन!
  अभिनंदन!!
  अभिनंदन!!!

 2. श्री. श्रीगणेश पुरूषोत्तम शेंडे, मु.पो. भुईंज ता. वाई जि. सातारा. says:

  मा. संपादक,
  श्री. विकास आवळे सर यांना,
  सस्नेहपूर्वक नमस्कार🙏

  आजि आनंदाचा दिनु, उगवला नभांगणी ।
  लेखणीचा हा सन्मान, मोद मनाच्या रंगणी ।।
  आज खरोखरच माझी फुगेवाला ही रचना आपण आपल्या शब्दांना सत्याचा रंग…सप्तरंग या दैनिकाद्वारे प्रसारित करून माझ्या लेखणीचा यथोचित सन्मान केलात, त्याबद्दल आपणांस मनःपूर्वक हार्दिक धन्यवाद…
  आपला कृपाभिलाषी,
  श्री. श्रीगणेश शेंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *