◼️ प्रासंगिक लेख :- वंद.तुकडोजी झाले राष्ट्रसंत ! [ भाग – १ ला ]

दि.११ ते १७ ऑक्टो. ‘रा.सं.तुकडोजी महाराज स्मृती सप्ताह’ विशेष..

🔶गुरुदेव जीवन उजियारा..🔶
वंद.तुकडोजी झाले राष्ट्रसंत ! [ भाग – १ ला ]

अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेद मिटविण्यासाठी ज्यांनी भजन व कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. स्वावलंबनाचे धडे ज्यांनी ‘ग्रामगीता’ या महाकाव्यातून आम्हा भारतीयांना दिले –
“खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा । झटू सर्वभावे करू स्वर्ग गावा ।
कळो हे वळो देह कार्यी पडू दे । घडू दे प्रभो! एवढे हे घडू दे ।।
[ पवित्र ग्रामगीता : प्रार्थना – कडवे ३ रे ]
ज्यांनी मराठी व हिंदी या दोन्ही भाषांमधून आपले स्फूर्तीकाव्य रचले. खंजरी भजन हे ज्यांच्या प्रबोधनाचे मुख्यवैशिष्ट्य होते. ज्यांची महान प्रेरणादायी काव्यसंपदा – (१) अनुभव सागर भजनावली, (२) राष्ट्रीय भजनावली, (३) राष्ट्रसंतांची अमृतधारा : भाग १ ते ३, (४) सेवा स्वधर्म आणि (५) लहर की बरखा – हिंदी आदी विशेष प्रसिद्ध आहेत. ते संत तुकडोजी महाराज अर्थात माणिक बंडोजी इंगळे ! त्यांना संपूर्ण देशभर ‘राष्ट्रसंत’ म्हणून ओळखले जाते. त्यांना आज दि.११ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांच्या ५३ व्या महानिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन !
विदर्भातील अमरावती जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या यावली या चिमुकल्या गावी माणिकचा जन्म झाला. ती तारीख होती ३० एप्रिल १९०९. बंडोजी उर्फ नामदेव गणेशपंत इंगळे – ठाकूर ब्रह्मभट्ट हे त्याचे तीर्थरुप बाबा. तर तीर्थरुप आईचे नाव मंजुळादेवी असे होते. भक्तीमय व सुसंस्कृत वातारणात त्यांचे लालनपालन झाले. वडिलांनी त्याचे नाव शाळेत दाखल केले. मात्र त्याची नेहमी शाळेला दांडी असायची. ‘शाळा कोणासी बरी, हुंदडा नदीकिनारी ।’ असे चाले. परंतु परीक्षेत उत्तीर्ण ! कारण त्यांना जीवनोद्देश गाठायचे होते –
“गाव हा विश्वाचा नकाशा । गावावरून देशाची परीक्षा ।
गावचि भंगता अवदशा । येईल देशा ।।
[ पवित्र ग्रामगीता : सद्धर्ममंथन पंचक : अध्याय १ ला : देवदर्शन : ओवी क्र.४९ ]
बालपणीच माणिकवर आईबरोबर घर सोडण्याची पाळी आली. तो वरखेड क्षेत्री नाथपंथी तत्वदर्शी गुरुदेव आडकोजी महाराजांच्या सानिध्यात आला. गुरुदेवांनी त्यांचे मूळनाव माणिक बदलून ‘तुकडोजी’ असे केले. गुरु आडकोजी बाबा समाधीस्थ झाले. त्यानंतर चिमुरभागातील श्रीमंत कृष्णराव भुते यांनी या बालयोग्याला नेरी येथे आणले. तेथील लोकांना त्यांनी मंत्रतंत्र व जादूटोणा ही अंधश्रद्धा असल्याचे पटवून दिले. चिमूर येथे ‘माणिक प्रसादिक बालसमाज’ स्थापन केले. श्रीमंत भुतेंनी इ.स.१९२९ साली राष्ट्रसंतांची पहिली हिंदी भजनावली प्रसिद्ध केली होती. जसे –
“ईश्वर भजन तुम्हारा, सब लोग गा रहे हैं ।
बिरलेने पा लिया है, तू सब को मिला नही हैं ।।”
पुढे आधुनिक महान संत तुकडोजी महाराज म्हणून प्रख्यात झाले. विदर्भात त्यांचा विशेष संचार होता. तरीही महाराष्ट्रभरच नव्हे तर संपूर्ण भारतभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढ्यावरच ते थांबले नाही तर जपानसारख्या परक्या देशात जाऊन त्यांनी तेथेही विश्वबंधुत्वाचे बीजारोपण केले, बंधुभावाचा संदेश प्रसारित केला –
“ऐसेचि होवो जनी वनी । संतोष होईल माझिया मनी ।
मित्रत्व वाढो त्रैभुवनी । तुकड्या म्हणे ध्येय हेचि ।।”
[ पवित्र ग्रामगीता : अर्पण-पत्रिका : ओवी क्र.७ ]
इ.स.१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना तुरुंगात डांबले होते. तुरुंगात असतांनाही त्यांनी जबरदस्त स्फुर्तीगीते रचून ते गात होते. ती स्वातंत्र्यवीरांसाठी स्फूर्तीदायक ठरली होती. इ.स.१९३० च्या वैदर्भीय गोंडवनातील सत्याग्रही शिबिरांमध्ये ‘झुठी गुलामशाही क्या डर बता रही है’ हे ओजस्वी राष्ट्रीय भजन सर्वत्र गाजले, म्हणून ब्रिटीश सरकारने महाराजांना पकडण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. अन्य एका राष्ट्रीय गीतात ते म्हणतात –
“चेत रहा हैं भारत दुख से, आग बुझाना मुश्किल हैं !
उठा तिरंगा बढावे छाती, अब बहिलाना मुश्किल हैं !!”
भारत हा खेड्यांचा देश आहे हे विचारात घेऊन ग्रामोन्नती साधता आली तर संपूर्ण राष्ट्राच्या विकासाला मदत होईल, असा त्यांचा दृढविश्वास व श्रद्धाभाव होता. म्हणून त्यांनी समाजातील विविध घटकांना जागृत करण्याचा संकल्प केला. आधी सर्व घटकांचा उद्धार कसा करता येईल? यास्तव त्यांनी अहर्निश चिंतन केले. खेडे-पाडे स्वयंपूर्ण कसे होईल? याविषयीची जी उपाययोजना वंद.तुकडोजी महाराजांनी सुचविली, ती आज अत्यंत प्रभावी ठरली आहे. गाव सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, गृहउद्योग व ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा पूर्ण कराव्यात, उद्योगधंद्यांना सुगीचे दिवस यावेत, प्रचारकांच्या रुपाने गावाला नेतृत्व लाभावे, अशी त्यांची आजीवन धडपड सुरूच होती. जसे –
“स्त्री-पुरुष ही दोन चाके । परस्पर पोषक होता निके ।
गाव नांदेल स्वर्गीय सुखे । तुकड्या म्हणे ।।”
[ पवित्र ग्रामगीता : संस्कारशोधन पंचक : अध्याय २१ वा : वैवाहिक जीवन : ओवी क्र.१०३ ]
यासर्व विकासकार्यांचे ठसठशीत प्रतिबिंब त्यांच्या पवित्र ग्रामगीता ग्रंथात उमटलेले दिसून येते. त्यांच्या अजरामर लेखनक्रांतीस मानाचा मुजरा ! [ क्रमशः ]
दररोज व नियमित वाचत रहा, दैनिक ‘चंद्रपूर सप्तरंग !’


◼️लेखक – श्री.कृ.गो.निकोडे गुरुजी.
मु. वंद.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक,
रामनगर वार्ड नं.२०, गडचिरोली, ता.जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ७४१४९८३३३९.
ई-मेल – nikodekrishnakumar@gmail.com

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *