◼️ प्रासंगिक लेख :- विद्यार्थ्यांचा अग्निपंख दाता : विश्व विद्यार्थी दिवस !

_मिसाईल मॅन भारतरत्न डॉ.कलाम जयंती विशेष_

विद्यार्थ्यांचा अग्निपंख दाता : विश्व विद्यार्थी दिवस !

जगात शिक्षक, डॉक्टर, नर्स, इंजिनीअर इत्यादींच्या नावाने विशेष दिवस साजरे केले जातात. तद्वतच विद्यार्थ्यांना अनुलक्षून व त्यांना अभ्यासात प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने विश्व विद्यार्थी दिवसाची संकल्पना पुढे आली. त्यातल्या त्यात भारतीय मिसाईल-मॅन विश्वविख्यात शास्त्रज्ञ डॉ.कलाम यांची कामगिरी अतुलनीय होती. त्यामुळेच यासाठी त्यांच्या जन्मदिवसाची निवड करण्यात आली. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे पूर्णनाव डॉ.अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे आहे. डॉ.कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती आणि जगप्रसिद्ध अंतरिक्ष संशोधकांचा आता १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात ‘विश्व विद्यार्थी दिवस’ म्हणून पाळला जात आहे. इ.स.२०१० मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा पहिला ‘विश्व विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला होता व पुढे नेहमीकरीता तोच दिवस निश्चित करण्यात आला.
राष्ट्रपती होण्यापुर्वी ’भारतरत्‍न’ हा भारताचा सर्वोच्‍च नागरी सन्मान मिळालेले ते भारताचे राष्ट्रपती आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्यात व मुलांशी गप्पा मारण्यात विशेष रस होता. युवकांनाही सदैव प्रेरणा मिळेल असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत उन्नत होणार्‍या भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत. स्वप्नांबद्दल ते नेहमी म्हणत असत –
“सपने वो नहीं है जो आप सोते वक्त देखें, बल्कि…
सपने वो है जो आपको नींद ही न आने दें ।”
आपल्या आयुष्यात कायम एक शिक्षक म्हणून मला ओळखले जावे, अशी इच्छा डॉ.कलाम साहेब नेहमी बोलून दाखवत असत. या प्रतिष्ठित शास्त्रज्ञांचा जगभरात अतिव आदर होता. त्यानंतर स्वित्झर्लंडने २६ मे हा ‘विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला. इस्रो, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या संशोधन कार्यात, वैज्ञानिक क्षेत्रात तसेच भारतीय अवकाश संशोधन संघटनेत त्यांचे कार्य अतुलनीय ठरले.
दि.१५ ऑक्टोबर १९३१ रोजी दिवंगत भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेबांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन व आईचे नाव अशिअम्मा होते. त्यांचे वडील नावाड्याचा व्यवसाय करून कसातरी प्रपंच भागवित असत. यांच्या शिक्षणासाठी बहिणीच्या अंगावरील दागिने विकावे लागले होते, असे सांगितले जाते. या महान शास्त्रज्ञाने क्षेपणास्त्रात भारताला स्वयंपूर्ण केले. भारताचे सर्वात आवडते राष्ट्रपती म्हणून ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांच्या क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रमाचा संपूर्ण जगाला अभिमान आहे. त्यांची वाणी अशी होती की देशभरातील विद्यार्थी त्याच्यांकडे मंत्रमुग्ध होऊन एकसारखे बघतच राहात होते. डॉ.कलाम यांना विद्यार्थ्यांना शिकविण्याची खुप आवड होती. ते शिलाँग येथील आय.एस.एम.च्या विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असत व अधिक वेळपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये रमून जात. हे एक सबळ कारण होते की त्यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ म्हणून मोठ्या सन्मानाने घोषीत करण्यात आला.
डॉ.कलाम साहेब हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. त्यांच्या राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ दि.२५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ असा होता. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांना इ.स.१९८१ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इस्त्रो आणि डीआरडीओमधील कामांबद्दल त्यांना इ.स.१९९० मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने तसेच संरक्षण तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आणि वैज्ञानिक संशोधनातील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना इ.स.१९९७ मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या अनेक संशोधनांपैकी एक म्हणजे पोखरण येथील अणुबॉम्बची यशस्वी चाचणी होय.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे उत्कृष्ट लेखकही होते. विंग्ज ऑफ फायर (अग्निपंख) हे पुस्तक तर सर्वाधिक जगप्रसिद्ध ठरले. माय ट्रॅव्हल, इग्निटेड माईंड्स ही त्यांची काही सुप्रसिद्ध पुस्तके आहेत. भारताला त्याच्या सन २०२० च्या ‘न्यू मिलेनियम’ या शक्ती प्रक्षेपणास त्यांनी एक नवी दृष्टी दिली. डॉ.कलाम हे एक अनमोल रत्न होते. त्यांनी देशाला अमोलिक खजिना दिला. दरवर्षी दि.१५ ऑक्टोबरला ‘जागतिक विद्यार्थी दिन’ त्यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, हे योग्यच आहे !
असे हे अष्टपैलू देशभक्त डॉ.कलाम साहेब दि.२७ जुलै २०१५ रोजी काळाच्या पडद्याआड झाले. तेव्हा भारताला जबर धक्का बसला. तर संपूर्ण जग हळहळले. आज जयंतीदिनी त्यांच्या जगत कल्याणकारी कार्यास साष्टांग दंडवत प्रणाम !
!! सर्व विद्यार्थी मित्रांना ‘जागतिक विद्यार्थी दिन’ निमित्त हार्दिक शुभेच्छा !!

– संकलक –
श्री.एन्.के.कुमार जी.(नि.अध्यापक).
मु.पोटेगांवरोड, पॉवर हाऊसच्या मागे, गडचिरोली. त.जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.
ई-मेल – krishnadas.nirankari@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *