शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषि सल्ला

शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषि सल्ला

चंद्रपूर, दि 14 ऑक्टोबर: पुढील पाच दिवसात दिनांक 14 ते 18 ऑक्टोबर 2020 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात अंशत: ढगाळ हवामान राहील. तसेच दिनांक 15 ऑक्टोबर रोजी बहुदा सर्वत्र ठिकाणी हलका पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. त्याचबरोबर दिनांक 16 ते 18 ऑक्टोबर रोजी विरळ ठिकाणी हलका पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित कृषी सल्ल्याच्या आधारावर पिकाचे योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि संशोधन केंद्र सिंदेवाही व जिल्हाअधिक्षक कृषि अधिकारी यांचे मार्फत करण्यात येत आहे.

◼️असा आहे हवामानावर आधारित कृषी सल्ला:

लाखोळी, पेरणी (उतेरा पक्क्वता अवस्था):

लवकर येणाऱ्या धान पिकात कापणीच्या 15 दिवसापूर्वी हेक्टरी 70 किलो लाखोळी (वाण, माहातोरा, रतन किंवा प्रतीक) उतेरा पध्दतीने पेरणी करावी. पेरणीसोबत हेक्टरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद दयावे.

पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबीयम व पिएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.

धान, लोंबी पक्क्वता अवस्था-

पुढील दोन दिवसात जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे त्यानुसार लवकर येणाऱ्या धान पिकाची कापणी करू नये. तसेच कापलेले पिक उन्हात वाळवल्यानंतर ताबडतोब मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

लवकर येणाऱ्या सरळ वाणांची भेसळ लोम्बी (लांबोरी) काढून टाकावे जेणे करून पुढील वर्षी पेरणीसाठी स्वताचे बियाणे वापरण्यात येईल.

लोंबी ते फुलोरा येण्याची अवस्था :-

मध्यम ते उशीरा कालावधीच्या धानामध्ये लोंबी येण्याच्या सुरूवातीस 25 टक्के (54 किलो) युरिया प्रति हेक्टरी दयावे व पोटरी अवस्थेत 10 सेंमी पाण्याची पातळी ठेवावी. ढगाळ वातावरणामुळे तपकीरी तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे तरी धान पिकात प्रति चुड 5 ते 10 तपकिरी तुडतुडे दिसताच त्यांच्या नियंत्रणासाठी मेटाराहयझिम अनीसोपली ही जैविक 2.50 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यावीत. रासायनिक किटकनाशक : बुफ्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 16 मिली किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 एसएल 2.2 मिली किंवा थायमिथाक्झाम 25 डब्ल्युजी 2 ग्रम किंवा असिफेट 75 टक्के 13 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.

पाने गुंडाळणारी अळी, बेरड, सुरळीतील अळी व शिंगे अळी यांच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 25 मि.ली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.

खोडकिडीचे 5 टक्के किडग्रस्त फुटवे दिसताच क्वीनॉलफॉस 32 मिली किंवा ट्रायझोफॉस 25 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे. लष्करी अळीचा प्रादुर्भावावर पाळत ठेवण्यासाठी सायंकाळी अर्धा तास प्रकाश सापळे लावावेत व या सापळ्यात पतंग आढळल्यास कृषि तज्ञास सूचित करावे.

करपा रोगाचा नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम 50 टक्के डब्ल्युपी 10 ग्रॅम किंवा मेन्कोझेब 75 टक्के प्रवाही 30 ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल 5 टक्के ई.सी. 20 मि.ली. किंवा टेबूकोनझोल 25 डब्ल्यूजी 15 ग्रॅम यापैकी एक बुरशीनाशक प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.

कडाकरपा रोगाचा नियंत्रणासाठी कॉपर हायड्रोक्साईड 53.8 टक्के डीएफ 30 ग्रम किंवा स्टेपटोमायसीन सल्फेट 90 टक्के + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड 10 टक्के एसपी हे संयुक्त जीवाणू नाशक 1.5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.

सोयाबीन – शेंगा पक्वता:

पक्वतेनुसार काढणी/कापणी कोरडे वातावरण व पाऊसाची उघडीप पाहून करावी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

कापूस- फुले व बोंडे अवस्था:

पीक फुलावर असतांना 2 टक्के युरिया़ची (200 ग्रॅम युरिया + 10 लिटर पाणी) आणि बोन्डे भरण्याचे अवस्थेत 2 टक्के डिएपी (200 ग्रॅम डिएपी + 10 लिटर पाणी) ची फवारणी करावी.

ढगाळ वातावरणामुळे रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मि.ली. किंवा बुफ्रोफेजीन 25 टक्के 20 मि.ली. किंवा प्रोफेनाफॉस 50 टक्के प्रवाही 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.

शेंदरी बोडअळीच्या निरीक्षणासाठी प्रति हेक्टरी 8 कामगंध सापळे लावावेत. या सापळयामधील अडकलेल्या नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच दर 21 दिवसानंतर वड्या (ल्युर) बदलत राहावे.

कपाशीला प्रादुर्भाव ग्रस्त डोमकल्या आढळल्यास दर आठवडयांनी अळीसहित वेचून नष्ट कराव्या. 5.5 टक्के प्रादुर्भाव दिसल्यास प्रोफेनाफॉस 50 टक्के प्रवाही 20 मि.ली. किंवा क्वीनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मि.ली. क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रावाही 25 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.

तूर फांदया अवस्था:

पाने गुंडाळणा-या अळीचा नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त फांदया काढून टाकावे. रासायनिक किटकनाशक: क्विनॉलफॉस 25 टक्के इसी 16 मि.ली. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एसजी 5 ग्रॅम प्रती 19 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हळद- कंद वाढीची अवस्था:

पानावरील ठिपके आढळताच कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. खोडमाशीचा नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने काढून जाळून टाकावे व निंबोळी अर्क 5 टक्के प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.

रासायनिक तणनाशक व किटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहूनच करावी. फवारणी करताना संरक्षक किटचा वापर आवश्य करावा.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *