◼️ प्रासंगिक लेख :- संत बहिणाबाई : स्त्रीसंतांची फडकती ध्वजा ! ◼️संत बहिणाबाई पुण्यतिथी विशेष

_आज दि.१७ ऑक्टो.संत बहिणाबाई पुण्यतिथी विशेष_

संत बहिणाबाई : स्त्रीसंतांची फडकती ध्वजा !

संतश्रेष्ठ बहिणाबाई या वारकरी संतसंप्रदायातील मराठमोळ्या स्त्रीसंत कवयित्री आणि जगद्गुरू संत तुकारामजी महाराजांच्या पट्टशिष्या होत्या. स्त्रीसंतांच्या मालिकेतील अग्रणी मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई, सखुबाई, सोयराबाई, आदींसह संत बहिणाबाईंचे स्थान वंदनीय आहे. त्यांची आज आश्विन शुद्ध प्रथमेस पावन पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !
संत बहिणाबाईंचे आडनाव माहेरचे कुलकर्णी तर सासरचे पाठक असे होते. त्यांचा बालपणापासून परमार्थाकडे कल होता. त्यांनी माहेरच्या माणसांसोबत व पतीबरोबर अनेक तीर्थयात्रा केल्या. एकदा वडगावकरांच्या कीर्तनात जगद्गुरू संत तुकारामजींचे अभंग ऐकून त्या तुकाराममय झाल्या. त्यांना सद्गुरु तुकारामजींनी स्वप्नात येऊन गुरुबोध दिला, असे त्या सांगत. पुढे प्रत्यक्ष त्यांना त्यांचे दर्शन झाल्यावर त्यांनी शिष्यत्व पत्करले. तथापि एका ब्राह्मण स्त्रीने शुद्राचे शिष्य व्हावे, ही गोष्ट सनातन्यांना कशी पटेल? मंबाजी स्वामीने तर त्यांचा अतोनात छळ मांडला. पण त्यांनी आपली गुरुभक्ती सोडली नाही. संतश्रेष्ठ बहिणाबाईंनी आपल्या सद्गुरुंचा उल्लेख पदोपदी आपल्या स्वरचित अभंगात करीत असत –
“तुका सद्गुरु सहोदर | भेटता अपार सुख होय ||”
अशा या महान बहिणाबाईंचा जन्म अंदाजे शके १५५१ मध्ये झाला. गोदावरी नदीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस कन्नड तालुक्यात वेळगंगा नदी वाहते. त्या नदीच्या तिरावरील देवगाव (रंगारी) येथे झाला. त्यांच्या आईचे नांव जानकी व पित्याचे नांव आऊजी कुलकर्णी असे होते. त्यांचा विवाह वयाच्या पाचव्या वर्षी गावापासून ५ कोसांवर असलेल्या गावातील एका युवकांशी झाला. तो पती ३० वर्षे वयाचा रत्नाकर पाठक नामक बिजवर होता. आधीची त्याला दोन अपत्येही होती. बालवयातच संत बहिणाबाईंना परमार्थात व ईश्वरभक्तित गोडी होती. कथा-कीर्तन, पुराण-श्रवण व सत्पुरुषांची सेवा यात त्या रमून जात.
पुढे-पुढे संत बहिणाबाईंची संसारावरची आसक्ती घटू लागली व पारमार्थिक वृत्ती वाढू लागली. घरची गरीबी, शिक्षणाचा अभाव तरीसुद्धा समाधानी वृत्ती आणि संतपदाला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात दृढ होती. त्यांच्या ओठांवर विठ्ठलाचे अखंड नामोच्चार चालत असे. शेतात काम करीत असतानांही हा भक्तिभाव अभंगाच्या रुपाने त्यांच्या मुखातून उमटत असे. पुढील कोल्हापूर येथील वास्तव्यात जयराम स्वामीच्या कथा-कीर्तनाचा त्यांच्या भाविक मनावर प्रचंड प्रभाव पडला. तशा त्या दररोज जगद्गुरू संत तुकारामजींचे अभंगं व भजनं गाऊ लागल्या व त्यांच्या दर्शनासाठी अधीर होत गेल्या. त्यांना संतश्रेष्ठ तुकोबारायांना सद्गुरू करून त्यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्यावयाचा होता. म्हणून त्या अहर्निश त्यांचे अभंग गुणगुणत ध्यान करू लागल्या. गुरुदिक्षा घेण्यापूर्वीच संतशिरोमणी तुकोबांचे महानिर्वाण झाले. त्यांची निष्ठा व श्रद्धा पाहून गुरुवर्यांनी कार्तिक वद्य पंचमी शके १५६९ रोजी स्वप्नात येऊन त्यांना साक्षात दर्शन व गुरूबोध दिला. त्यांचे सारे जीवन गुरूबोधामुळे बदलून गेले. त्यांनी अभंग रचला –
“तुकाराम भेटले | धन्य जिने माझे ||
कृतकृत्य झाले | सहजचि ||”
त्यांनी आपले सद्गुरु जगद्गुरू संत तुकाराम महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा वर्णन केली आहे. त्यांच्याविषयी प्रत्यक्षात माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत. त्यामुळे या अभंगांना विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. संतश्रेष्ठ बहिणाबाईंचा अत्यंत सुपरिचित अभंग असा आहे –
“संत कृपा झाली, इमारत फळा आली || ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया ||
नामा तयाचा किंकर, तेणे विस्तारले आवार || जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत ||
तुका झालासे कळस, भजन करा सावकाश || बहिणा फडकती ध्वजा, तेणे रुप केले ओजा ||”
त्यांच्या नावावर एकूण काव्यरचना ७३२ आहेत. त्यांत श्लोक, ओवी, अभंग, आरती इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्या या काव्यरचना म्हणजेच भक्तिभावाचा उत्स्फूर्त आविष्कार होय. वेदान्ताचे प्रतिपादनही त्यात आढळून येते. त्यांनी आपल्या अभंगातून ब्राह्मण कोण? असा प्रश्न उपस्थित करून ब्राह्मण व सनातनी वृत्तीवर कडाडून टीका केली. त्यांनी स्वतः ब्राह्मण असूनही भेदभावाला छेद दिला. त्यांचे अभंग १७ व्या शतकातील. मात्र ते २० व्या शतकात प्रसिद्ध झाले, ही शोकांतिका ! त्यांची काव्यशैली अत्यंत साधी, सरळ पण हृदयस्पर्शी आहे.
“घट फुटलियावरी | नभ नभाचे अंतरी ||”
उक्त अंतिम अभंग रचल्यावर या ‘स्त्रीसंतांची फडकती ध्वजा’ – संतश्रेष्ठ बहिणाबाई आजच्या तिथीला आश्विन शुद्ध १ म्हणजेच इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे दिनांक २ ऑक्टोबर १७०० रोजी समाधीस्थ झाल्या.
!! पावन पुण्यतिथी निमित्त त्यांच्या चरणारविंदावर ‘चंद्रपूर सप्तरंग’ तर्फे ही तुटकी-फुटकी थोडीशी शब्दसुमने समर्पित !!

🔶🔷- संकलक -🔷🔶

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(मराठी साहित्यिक व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक)
मु.श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ, रामनगर वार्ड नं.२०, गडचिरोली.
जि.गडचिरोली फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.
ई-मेल – nikodekrishnakumar@gmail.com

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *