परतीचा पाऊस
नको नको रे पावसा
असा अवेळी तू येऊ,
लेकरांचा माझ्या
घास हिसकावून नेऊ!
ऊन्हातान्हात राबून
किती पिकवलं सोनं,
तुझ्या कोसळत्या धारांनी
गेलं क्षणात वाहून!
कसा झाला रे निष्ठुर
नाही आली तुला दया,
राबराबून दिनरात
जीर्ण झाली माझी काया!
उभ्या जगाचा पोशिंदा
पण आज आहे मी उपाशी,
कोण मिळेल का वाली
भूक भागवावी कशी?
गोठ्यामधली जित्राबं
काय घालू त्यांना चारा,
झालं होत्याचं नव्हतं
कुठे शोधू मी निवारा!
परतीचा तू पाऊस
आज वाटतो नकोसा,
थांबव ना रे तुझा कोप
मग वाटेल तू हवासा!
अवघ्या चराचराला
आस तुझ्या आगमनाची,
का रे झालास निष्ठुर
आज भ्रांत जगण्याची !!!