◼️ प्रासंगिक लेख :- जागतिक लोकशक्ती दिन – जागृत जनता, भूषण भारता !

– जागतिक लोकशक्ती दिन –

जागृत जनता, भूषण भारता !

जगभरात जागतिक सांख्यिकी दिन दर पाच वर्षांनी २० ऑक्टोबर रोजी साजरा होत असतो. जागतिक स्तरावर त्याची सुरुवात इ.स.२०१० पासून झाली आहे. आपण मराठी भाषिक त्यालाच विश्व लोकशक्ती दिन म्हणून पाळत असतो. भारतात तो प्रो.प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या स्मरणार्थ सर्वप्रथम दि.२९ जून २०१३ रोजी साजरा करण्यात आला होता. भारतीय जनमानसात विशेषतः तरूण पिढीत जागरूकता निर्माण करून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. आपल्या देशात प्रत्येक सांख्यिकी दिनी वेगवेगळे विषय दृष्टीसममोर ठेवून त्यावर उपाययोजना केल्या जातात. जसे – लोकसंख्या वाढ, कुपोषण, लैंगिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक अशाप्रकारच्या विभिन्न बाबी व समस्यांवर भर देण्यात येणार आहे. आपल्या मुलभूत गरजा – (१) अन्न, (२) आरोग्य, (३) वस्त्र, (४) निवारा व (५) शिक्षण या पूर्ण करण्याच्या दृष्टीने सदर जागृती महत्त्वाची ठरेल, अशी अपेक्षा ठेवणे वावगे ठरू नये. मात्र संतोक्तीप्रमाणे संयम ठेवणे गरजेचे आहे – 

“जैसी भी हो परिस्थिती । वैसी रहे मनस्थिती ।।”
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व नागरिकांस एक फार मोठे शक्तीशाली शस्त्र बहाल केले. त्याचे नाव आहे भारतीय संविधान! त्यात न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आदी अधिकारांसह कर्तव्येही पार पाडण्यास सांगितले आहे. त्यांचेही दृढीकरण होऊन त्यांना यथायोग्य बळकटी मिळणे गरजेचे आहे. तेव्हाच कुठे नागरिकांत एकता व एकात्मता प्रविष्ट होईल आणि त्यायोगे देशाची लोकशक्ती एकवटून अधिक प्रबळ व प्रभावशाली होईल. अन्यथा लोकसंख्या तर जगाच्या तुलनेत सर्वात जास्त असेल. मात्र सर्वत्र भेदाभेद, गटबाजी, आतंकवाद, प्रांतवाद, जातीभेद, धर्मवाद यासारख्या कारणाने भारतीयांचे कसे शकले-शकले होतील! यामुळे जनतेत ‘एकी’ व ‘नेकी’ नावाच्या गोष्टी शोधूनही सांपडू शकणार नाहीत. म्हणून यासह जनतेच्या मुलभूत गरजा प्रकर्षाने व प्राधान्याने विचारात घेऊन त्या पूर्णत्वास नेण्याच्या इराद्याने शासन, तज्ज्ञमंडळी व जाणकारांनी पाऊले उचलावीत. माणसाला मुलभूत गरजा भागविण्यासाठी त्याच्या पाठीसी आर्थिकबळ असणे अत्यावश्यक आहे. देशातील दुर्गम व संवेदनशील भागात अर्थसहाय्य मिळत नाही. त्यामुळे युवकवर्ग बेरोजगारीने बेजार झाला आहे. पैशाच्या लालसेपोटी तो कुमार्गाकडे झुकत आहे. गावाकडे लोकसंख्येच्या विस्फोटाने शेतीवाडीचा एकरतुकडा, हिस्सावाटाही नशीब होत नाही. तेथे उद्योग-धंद्यांचीही वाणवा असते. माझी आजीमाय नेहमी म्हणायची अगदी तसेच आहे तेथे –
“हाती नाही नाणे ।
तोंड केविलवाणे ।।”
(१) अन्न – अन्न-उत्पादक अन्नदाता माझा शेतकरीबंधू दरवर्षीच्या नापिकीमुळे पुरता जर्जर होत आहे. शासन मोठ्या नाकाने मिरवून सांगत असते की देशात अन्नधान्यांचा तुटवडा नाही. मात्र नापिकीला कंटाळून शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. बरेच लोक उपासमारीने जीवनाला कंटाळले आहेत. देशातील १४ टक्के लोक कुपोषणाचे बळी ठरत आहेत. रोजची रोजीरोटी कमवून कुटूंब पोसणाऱ्यांचीही धडगती काही कमी नाही. शेतकरी, शेतमजूर व कामगार यांच्या उत्कर्षाची तजवीज सर्वप्रथम होणे आवश्यक आहे. यांना गरजू म्हणून अन्नधान्य मोफत पुरवून त्यांच्या ऐदी, आळशी व ऐतखाऊ वृत्तींना निमंत्रित केले जात आहे, ही तर भविष्यातील धोक्याची घंटा आहे. ‘काम के बदले दाम!’ असे श्रमसाफल्यास प्रेरणादायी उपाय योजले पाहिजेत. अन्यथा लोकोक्तीप्रमाणे ठरलेलेच –
“टाली का टुली, बेशरम झाली ।
म्हणा का बोला, पोटाले घाला ।।”
शेतकरीबांधवासह हे घटक जगले तर देश जगेल आणि खऱ्या अर्थाने तेव्हाच तो स्वयंपूर्ण व बलशाली होऊ शकेल.
(२) आरोग्य – मानवाला अन्न, हवा, पाणी आदी घटक शुद्धस्वरुपात मिळाले तर त्याचे आरोग्य उत्तम राहिल. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी त्याचे मनही प्रसन्न असावे लागेल. मन थाऱ्यावर तेव्हाच असेल जेव्हा त्याच्या हातात आर्थिकबळ असेल. योग्य औषधोपचाराशिवाय तो सुदृढ व निरोगी कसा बरे राहू शकेल? बेरोजगार युवकांचा हाताला काम मिळत राहिले तर त्याच्या सर्व समस्या चुटकीसरशी सुटू शकतील. निरोगी-निर्विकार जनता खरेच राष्ट्राची अभेद्य ताकद ठरेल, यात शंकाच नाही.
(३) वस्त्र – दोन वेळचं पोटाला अन्न मिळणं दुरापास्त तिथं वस्त्र-प्रावरणाचं काय धरून फिरताय राव? एकीकडे आवश्यकता नसताना कपड्यांच्या घड्यांवर घड्या दिसतात. जुने झाले, तेच ते वापरून बोअर झाले. म्हणून जाळून भस्मसात करणारी गर्भश्रीमंताची औलाद तर दुसरीकडे अब्रू झाकण्यासाठी गाठीला गाठ मारून अक्षरशः चाळणी झालेली वस्त्रे परिधान करणारी, पण हातभर चिंधोटीही घेण्याची लायकी नसणारी दरिद्री लोकांचीही संख्या या देशात काही कमी नाही. कित्ती मोठा हा विरोधाभास? मग राष्ट्राचे बळकटीकरण नुसत्या अधांतरीच्या बातांनी कसे काय शक्य आहे? कुणीतरी शहाण्याने म्हंटले आहेच –
“बने अगर बातों से बात,
तो फिर बात ही क्या है?”
ते अगदी योग्यच प्रतित होते.
(४) निवारा – आज घटकेला देशात डोक्यांवर धड छप्पर नसणारे कितीतरी कुटुंबं आहेत. काही दळभद्री लोक शहरां-शहरातील फुटपाथवर पाली लावून राहुट्या, खोपट्या उभारून यमयातना भोगताना दिसतात. भिक्षेकरी लोक मिळेल त्या पडक्यापुडक्या घरांचा, सरकारी इमारतींच्या शेड व वऱ्हांड्यांचा आसरा शोधत फिरताना आढळून येतात. ऊन, वादळ, पाऊस, थंडी आदी परिस्थितींशी अहर्निश झगडत राहणे त्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहे, असे वाटते. हे कशामुळे? त्यांची आर्थिक बाजू भक्कम नाही, म्हणूनच ना? दारिद्र्य निर्मुलन करण्याची ठोस उपाययोजना तातडीने हाती घेणे अत्यंत निकडीचे वाटते. ग्रामीण भागात एक म्हण नेहमी ऐकण्यात येते, तशीच गत आहे –
“गरीबाले गत नाही ।
कोणी काही देत नाही ।।”
(५) शिक्षण – शिक्षणमहर्षी महात्मा फुले दांपत्यानी आमरण प्रयत्नांची पराकाष्ठा केली. म्हणूनच आज संपूर्ण भारतात सर्वांना मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा अलभ्य लाभ मिळत आहे. मात्र उच्च व महागडं शिक्षण दरिद्री मायबापाची लेकरं घेऊ शकत नाहीत. इच्छा व हुशारी असूनही त्याला आपलं अर्ध्यावरच डाव मोडावं लागतं. शासकीय प्राथमिक शिक्षकाचे अध्यापनाचे काम बाजूला सारून त्यांना अशैक्षणिक कार्यात गोवले जात आहे. त्याला नुसता हरकाम्या गंपू करून ठेवले आहे. मीठाविना सारा स्वयंपाक आळणी ठरावा, अगदी तस्से! परिणामी विद्यार्थी शाळाबाह्य होत आहेत. शिक्षकांना पशू गणनेपासून तर शौचालयांच्या मोजमापापर्यंत जुंपले जाते. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान गमावला गेला आहे. कालपरवा शाळा सोडलेला शेंबड्या पोरगासुद्धा शिक्षकांशी अरेरावी व अर्वाच्य शब्दांत बोलून पाणउतारा काढताना दिसतो. याला काही मर्यादा पडावयास नको का? भविष्यातील राष्ट्राच्या समृद्धीचे हेच प्राथमिक शिक्षण व शिक्षक आधारस्तंभ आहेत. ही जाणीव निर्माण व्हावी.
देशाला सर्वांगाने सक्षम करण्याची ध्येय-धोरणे आधी निश्चित केली पाहिजेत. तो सुजलाम्-सुफलाम् नक्कीच होईल. तरूणांसह आबालवृद्ध स्त्री-पुरुष जागृत होऊन अन्याय व अत्याचारांना खीळ बसेल. तेव्हाच राष्ट्रीय एकात्मता साधून लोकशक्तीमुळे राष्ट्रशक्ती वृद्धिंगत झाली म्हणता येईल. त्यावेळी माझा भारतदेश आभुषणाविनाही सुशोभित होऊन जगात मिरवेल, यात दुमत नाहीच!

🔷🔶🔷🔶- लेखक -🔶🔷🔶🔷

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी,
(मराठी साहित्यिक व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक)
मु.पिसेवडधा पो.देलनवाडी, ता.आरमोरी जि.गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.
nikodekrishnakumar@gmail.com

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *